
फॅटी लिव्हर हा यकृतात चरबीचा साठा वाढल्याने होणारा विकार असून, तो चुकीच्या जीवनशैली, आहार आणि काही वैद्यकीय कारणांमुळे होतो. सुरुवातीला ठळक लक्षणे नसलेला हा आजार नंतर यकृताच्या गंभीर आजारांमध्ये रूपांतर होण्याचा धोका असतो.
– डॉ. शशांक शहा
मानवी शरीरातील यकृत हा सर्वात मोठा आणि बहुपयोगी अवयव आहे. पचनक्रिया, पोषकद्रव्यांचे साठवण, विषारी घटकांचे निर्मूलन, ऊर्जानिर्मिती आणि रोगप्रतिकारक शक्तीला वाढविणे अशा शेकडो प्रक्रियेत यकृताचा सक्रिय सहभाग असतो. परंतु आधुनिक जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे, चुकीच्या आहारामुळे आणि शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे यकृतामध्ये चरबी जमा होण्याचा वेग वाढला आहे. ही स्थिती म्हणजेच फॅटी लिव्हर. सुरुवातीला ही अवस्था साधी वाटली तरी दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती गंभीर आजारांमध्ये रूपांतर होण्याचा धोका सातत्याने वाढत आहे.
फॅटी लिव्हर म्हणजे काय?
सामान्य स्थितीत यकृतामध्ये अल्प प्रमाणात चरबी असते (साधारण ५ टक्क्यांपेक्षा कमी). यकृतातील चरबीचे प्रमाण जेव्हा ५ टक्क्यांपेक्षा जास्त होते, तेव्हा ही अवस्था फॅटी लिव्हर म्हणून ओळखली जाते. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास यकृताचे कार्य बिघडू लागते आणि गंभीर आजारांना आमंत्रण मिळते.
फॅटी लिव्हरचे प्रकार
अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (Alcoholic Fatty Liver Disease – AFLD)
अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार काही अचानक होत नाही. यकृताचा आकार वाढण्याची प्रक्रिया दीर्घकाळ सुरु असते. विशेषतः जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ती प्रकर्षाने आढळते. अल्कोहोलचे विघटन करताना यकृतावर मोठा ताण येतो. यकृत पेशींमध्ये अल्कोहोलचे विघटन होऊन तयार होणाऱ्या रसायनांमुळे पेशींमध्ये सूज (Inflammation) येते, चरबीचा संचय वाढतो आणि पेशींच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर प्रभावी उपचार करून तो रोखता येतो. त्यासाठी मद्यपान पूर्णपणे थांबवणे आणि चांगल्या आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून यकृत पुन्हा निरोगी होऊ शकते. मात्र, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास हे अल्कोहोलिक हेपॅटायटीस त्याच्या पुढे सिरॉसिस आणि शेवटी यकृत निकामी होण्यापर्यंत पोहोचू शकते.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (Non-Alcoholic Fatty Liver Disease – NAFLD)
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा प्रकार मद्यपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसतो. याचे मुख्य कारण मेटाबोलिक सिंड्रोम आहे. त्यामध्ये लठ्ठपणा, विशेषतः पोटाभोवती चरबी वाढणे, टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि रक्तातील चरबी (कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स) वाढणे यांचा समावेश होतो. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता आणि ताण हे या विकाराला अधिक चालना देतात. NAFLD सुरुवातीला लक्षणविरहित असतो. पण हळूहळू यकृताच्या पेशींमध्ये चरबी साठत राहते आणि यकृताची कार्यक्षमता कमी होऊ लागते. आजाराच्या सुरुवातीलाच निदान आणि प्रभावी उपाय केल्यास हा रुग्ण यातून बरा होण्याची शक्यता असते. परंतु दुर्लक्ष झाल्यास पुढे उपचारातील गुंतागुंत वाढून रुग्णाच्या जीवाचा धोका वाढतो.
नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस (Non-Alcoholic Steatohepatitis – NASH)
NASH हा NAFLD चा गंभीर आणि प्रगत टप्पा आहे. यात फक्त चरबीचा संचयच होत नाही, तर यकृत पेशींमध्ये तीव्र सूज (Inflammation) व पेशींचे नुकसान (Cell injury) देखील होते. या अवस्थेत यकृतातील पेशी हळूहळू तंतुमय (fibrotic) होऊ लागतात. त्याला वैद्यकीय परिभाषेत फायब्रोसिस असे म्हणतात. उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास NASH पुढे सिरॉसिसमध्ये बदलतो. यकृताचा संरचना पूर्णतः बदलते आणि कार्यक्षमता घटते. काही प्रकरणांत यकृताचा कर्करोग (Hepatocellular Carcinoma) देखील होऊ शकतो. NASH चे निदान बहुतेक वेळा रक्त तपासण्या, सोनोग्राफी, फायब्रोस्कॅन आणि आवश्यक
असल्यास लिव्हर बायोप्सीद्वारे केले जाते.
फॅटी लिव्हर होण्याची प्रमुख कारणे
फॅटी लिव्हर हा आजार बहुतेक वेळा आपल्या जीवनशैली आणि आहाराच्या पद्धतींशी संबंधित असतो. याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही थेट आपल्या दैनंदिन सवयींशी संबंधित आहेत. तर काही आजारांमुळे फॅटी लिव्हर होते. त्या कारणांची माहिती असणे ही आजच्या काळाची गरज ठरली आहे.
१. अयोग्य आहार : जास्त प्रमाणात तेलकट, तुपकट पदार्थ, साखरेचे आणि सातत्याने कार्बोहायड्रेटयुक्त (उदाहरणार्थ मैदा, ब्रेड, मिठाई) पदार्थ सेवन केल्याने शरीरात जास्त कॅलरीज जमा होतात. ही अतिरिक्त ऊर्जा यकृतात चरबीच्या स्वरूपात साठवली जाते.
२. लठ्ठपणा : विशेषतः पोटाभोवतीची चरबी (Visceral Fat) वाढल्यास यकृताच्या कार्यावर थेट परिणाम होतो. लठ्ठपणामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता (Insulin Resistance) वाढते, त्यामुळे यकृतात चरबी जमा होण्याची प्रक्रिया वेगाने होते.
३. मधुमेह : रक्तातील साखरेचे प्रमाण सतत जास्त राहिल्यास शरीरात चरबीचे विघटन बिघडते आणि ही चरबी यकृतात साठते. मधुमेह असणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हरची शक्यता साधारण दुपटीने वाढलेली असते.
४. उच्च कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स : रक्तातील चरबीचे प्रमाण जास्त असणे हे फॅटी लिव्हरसाठी अत्यंत धोकादायक ठरते. यकृत हे कोलेस्टेरॉलचे मुख्य नियामक असल्याने, त्यात असमतोल आल्यास चरबी यकृतात साठून राहते.
५. व्यायामाचा अभाव : नियमित व्यायामाचा अभाव हा फॅटी लिव्हरचा प्रमुख कारणीभूत घटक आहे. हालचालींअभावी शरीरातील चरबी जाळली जात नाही आणि यकृतात चरबीचा संचय होतो.
६. मद्यपान : सतत किंवा अति मद्यसेवन हे अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे मुख्य कारण आहे. मद्यपानामुळे यकृत पेशींमध्ये सूज, दाह आणि चरबीचा संचय होतो. त्यामुळे यकृताची कार्यक्षमता हळूहळू कमी होते.
७. काही औषधांचा दीर्घकालीन वापर : स्टेरॉईड्स, टॅमॉक्सिफेन, अँटिरेट्रोव्हायरल्स यांसारखी काही औषधे दीर्घकाळ घेतल्यास यकृतातील चरबीचे प्रमाण वाढते.
८. जलद वजन घटवणे : क्रॅश डाएट किंवा अचानक वजन घटल्यास शरीराच्या चयापचय प्रक्रियेत (Metabolism) मोठा बदल होतो. त्यातून यकृतात तात्पुरता पण लक्षणीय चरबी संचय होऊ शकतो.
९. कुपोषण : प्रथिनांची कमतरता असलेला आहार घेतल्याने यकृतातील चरबीचे विघटन योग्य रीतीने होत नाही. दीर्घकाळ कुपोषण राहिल्यास फॅटी लिव्हरची शक्यता वाढते.
फॅटी लिव्हरची लक्षणे
फॅटी लिव्हरचा सुरुवातीचा टप्पा बहुतेक वेळा कोणतीच ठळक लक्षणे रुग्णाला जाणवत नाहीत. त्यामुळे या आपल्याला पोटात काही तरी भीषण घडतंय याची जाणीव व्यक्तीला अजिबात नसते. बऱ्याच वेळा सोनोग्राफी, सीटी स्कॅन किंवा इतर तपासण्यांदरम्यान योगायोगाने हा विकार निदान होतो. पण, काही रुग्णांमध्ये खालील लक्षणे दिसतात.
- पोटाच्या उजव्या बाजूला सौम्य वेदना : पोटाच्या उजव्या वरच्या बाजूस (जिथे यकृत असते) अस्वस्थता, बोथट वेदना किंवा जडपणा जाणवणे हे त्यापैकी एक प्रमुख लक्षण आहे. याशिवाय, सतत थकवा, अशक्तपणा आणि दैनंदिन कामांमध्ये ऊर्जा कमी जाणवणे देखील आढळते.
- पचनसंस्थेतील बिघाड : पचनसंस्थेवर परिणाम झाल्यामुळे मळमळ, भूक मंदावणे, आणि जेवल्यावर जडपणा वाटणे अशी लक्षणे निर्माण होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये वजन हळूहळू वाढते, तर नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीससारख्या गंभीर अवस्थेत उलट वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
- काविळ : फॅटी लिव्हरचा आजार गंभीर टप्प्यात असतानाची लक्षणे ठळकपणे दिसतात तोपर्यंत यकृतावर मोठा परिणाम झालेला असतो. काविळ होण्याची शक्यता असते. पोटात पाणी साठणे, सहज रक्तस्राव होणे आणि त्वचा खाजवणे अशी गंभीर लक्षणे दिसून येतात. ही अवस्था बहुधा सिरॉसिस किंवा यकृत निकामी होण्याची सुरुवात असते.
निदान
फॅटी लिव्हरचे निदान साधारणपणे विविध तपासण्या आणि प्रतिमा चाचण्यांद्वारे केले जाते. सुरुवातीच्या टप्प्यात ही समस्या कोणतीही ठळक लक्षणे न दर्शवता शांतपणे वाढत असल्याने, योग्य तपासण्या करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
- सोनोग्राफी : ही सर्वाधिक वापरली जाणारी व सहज उपलब्ध चाचणी आहे. सोनोग्राफीद्वारे यकृतातील चरबीचे प्रमाण आणि संरचनेत झालेला बदल दिसून येतो.
- लिव्हर फंक्शन टेस्ट : रक्त तपासणीत SGPT आणि SGOT या यकृत एन्झाइम्सचे प्रमाण वाढलेले असू शकते. ही वाढ यकृताच्या पेशींवर ताण किंवा नुकसान झाल्याचे सूचक असते.
- फाइब्रोस्कॅन : ही विशेष तपासणी यकृतातील फायब्रोसिसचे निदान होते. यकृतातील चरबीबरोबरच फायब्रोसिसचे प्रमाण जाणून घेण्यासाठी ही चाचणी उपयुक्त आहे.
- एमआरआय / सिटी स्कॅन : या इमेजिंग चाचण्यांद्वारे यकृताची तपशीलवार व स्पष्ट प्रतिमा मिळते. यामुळे चरबीचे प्रमाण, सूज आणि रचनात्मक बदल अचूकपणे पाहता येतात.
- लिव्हर बायोप्सी : हे निदानाचे गोल्ड स्टँडर्ड मानले जाते. बारीक सुईद्वारे यकृताचा सूक्ष्म नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासला जातो. यामध्ये यकृतातील सूज, पेशींवरील नुकसान आणि चरबीचे प्रमाण निश्चित केले जाते. गंभीर आणि गुंतागुंतीच्या रुग्णांमध्ये ही चाचणी आवश्यक ठरते.
लाइफस्टाइल डिसीज
फॅटी लिव्हर ही आजच्या काळातील ‘लाइफस्टाइल डिसीज’ मानली जाते. ही समस्या सुरुवातीला निरुपद्रवी वाटली तरी दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. चांगली गोष्ट म्हणजे जीवनशैलीत बदल करून ही स्थिती बऱ्याच प्रमाणात उलटवता येते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, मद्यपान टाळणे व वजन नियंत्रण या चार साध्या नियमांचे पालन केल्यास यकृत दीर्घकाळ निरोगी राहू शकते.
फॅटी लिव्हरचा आजार म्हणजे यकृतामध्ये फॅट जमा होणे. पण, ते फक्त यकृतामध्ये फॅट म्हणजे चरबी जमा होणे इतक्यापुरतं मर्यादित नसतं. त्यातून लिव्हर फायब्रोसिस नावाचा आजार होण्याची शक्यता असते. फॅटमुळे आलेल्या सुजेमुळे तिथे व्रण तयार होतो. त्याचा थेट परिणाम यकृताची कार्यक्षमता कमी होते. सध्याच्या नवीन संशोधनानुसार लिव्हर सोरॅसिस हे लिव्हर कॅन्सरचं एक मुख्य कारण असू शकतं. फॅटी लिव्हरचं निदान करताना प्रत्येक वेळी सोनोग्राफी करावी लागतेच असं नाही. पोटाचा घेर पुढून वाढला किंवा पोट जर आडवं वाढलं तर अशा स्थितीत लिव्हर तेवढं मोठं झालं, असं क्लिनिकली गृहित धरायचा हरकत नसते.
आजपर्यंतच्या वैद्यकीय संशोधनानुसार फॅटी लिव्हर, फायब्रोसिस कमी करणारे आणि यकृताची क्षमता वाढविण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हा एकच उपाय होता. आता नवीन प्रकारची इंजेक्शन वैद्यकीय संशोधनातून पुढे आली आहेत. त्याचा काही फरक आणि चांगला परिणाम रुग्णांवर दिसून येत आहे. पण, या इंजेक्शनचा दुष्परिणाम आणि ती आयुष्यभर घेत राहणे याचे मोठे आव्हान अद्यापही कायम आहे. ज्या व्यक्तीला घोरण्याचा आजार आहे. मधुमेहाचे निदान झाले आहे. फॅटी लिव्हर एक, दोन, तीन आणि चार अशा वेगवेगळ्या ग्रेडमध्ये असते. त्यापैकी दोन किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि पोटाचा घेर वाढलेला असेल त्यांनी फॅटी लिव्हवरवर तातडीने प्रभावी आणि परिणामकारक उपचार करणे ही काळाची गरज ठरली आहे.