बापरे! प्रसूती झालेल्या महिलेच्या पित्ताशयातून १०-१२ नाही तब्बल हजाराहून अधिक खडे काढले

काही दिवसांपूर्वीच प्रसूती झालेल्या एका तीस वर्षीय महिलेच्या ओटीपोटात तीव्र वेदना होत असल्याने डॉक्टरांनी 'सोनोग्राफी' केली. या महिलेच्या पित्ताशयात खडे तयार झाल्याचे 'सोनोग्राफी' मध्ये दिसून आले. बाळाला नियमित स्तन्यपान करावे लागत असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. मात्र, ओटीपोटात वारंवार तीव्र वेदना जाणवू लागल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या २० मिनिटांत पित्ताशयातील सुमारे एक हजारहून अधिक खडे काढून या महिलेला वेदनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले. 'लॅपरो ओबेसो सेंटरचे 'लॅपरोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी सांगितले, 'महिलेच्या पित्ताशयात खडे झाल्याने तीव्र वेदना, पोटदुखीचा त्रास जाणवत होता. पित्ताशयावर ताण येत असल्याने त्यांना जास्त प्रमाणात अस्वस्थपणा जाणवत होता. वारंवार तीव्र वेदना होत असल्याने लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया सुरू असताना पित्ताशयामध्ये मोठ्या प्रमाणावर खडे आढळून येत होते.शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर खडे मोजले असता एक हजारहून अधिक खडे आढळून आले. पित्ताशयात हिरव्या, पिवळ्या रंगाचे खडे बाहेर काढण्यात आले आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेला २० तासांच्या आत घरी सोडण्यात आले असून, ही महिला दैनंदिन कामे करण्यास सक्षम झाली आहे.' देशात पित्ताशयात खडे होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून, हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत गेले असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

CALL NOW BOOK NOW  CHAT