कोव्हिडनंतर स्थूलपणाला कात्री, बॅरिएट्रीक सर्जरीकडे वाढतोय कल

कोरोना हा सहव्याधी रुग्णांसाठी जसा जीवघेणा आहे, तसाच तो स्थूल लोकांसाठीसुद्धा धोकादायक आहे. लठ्ठपणा या आजाराचे शिकार असलेल्या लोकांना कोविडमुळे श्वसनात अनेक अडचणी येतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आता स्थूलपणाला कात्री लावण्यासाठी लोकं बॅरिएट्रीक सर्जरीकडे वळत आहेत.

स्थूलव्यक्ती मरता-मरता बचावले

वाढत्या स्थूलतेकडे दुर्लक्ष करणार्‍या माणसांनी आता अंगावर वाढलेली अतिरिक्त चरबी घटवण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सुरुवात केलीय. कोव्हिडची बाधा झाल्यानंतर थोडक्यात बचावलेले रुग्ण आता कटाक्षाने वजन नियंत्रित राखण्यात तसेच बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया करण्याकडे लक्ष देत आहेत. यापैकी बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया करणा-या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे मत लीलावती रुग्णालयाचे बॅरिएट्रीक सर्जन डॉक्टर शशांक शाह यांनी व्यक्त केले. या शस्त्रक्रियांना आता इन्शुअरन्सचाही आधार मिळू लागल्याने रुग्णांचा आर्थिक भारही हलका झाला आहे. त्यामुळे या शस्त्रक्रिया वाढू लागल्या आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे आता सर्व वयोमानात स्थूलता दिसून येत आहे. मुळात स्थूलता हा आजार असल्याबाबत आजही जनसामान्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. ज्या रुग्णांनी औषधोपचार घेतले त्यांनाही कित्येकदा पुन्हा स्थूलतेचा सामना करावा लागला. परंतु कोव्हिडकाळात हे रुग्ण मरता -मरता बचावले, असेही डॉक्टर शाह म्हणाले.

डॉ. शहांनी सांगितला अनुभव

स्थूल रुग्णांना उपचारांना प्रतिसाद देताना असंख्य अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये स्थूलतेचे प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी मांडला. याबाबतचा अनुभव मांडताना बॅरीएट्रीक सर्जन डॉक्टर शशांक शाह यांनी सख्या दोन भावांचे उदाहरण देखील दिले.यापैकी ज्या भावाने वजन नियंत्रित न राहिल्याने बॅरिएट्रीक शस्रक्रियेकडे कानाडोळा केला,त्याला कोविड झाल्यानंतर कित्येक दिवस अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. मरणातून वाचल्यानंतर त्याने दीड महिन्यानंतर त्वरित बॅरिएट्रीक शस्रक्रिया केली, अशी माहिती शाह यांनी दिली. मात्र ज्या भावाने कोविडची बाधा होण्याअगोदरच बॅरिएट्रीक शस्रक्रिया केलेली त्याच्या उपचारांत अडचणी आल्या नाहीत, तो या जीवघेण्या आजारातून सुखरुप बाहेर आला, असं शाह पुढे म्हणाले.

बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेविषयी

  • बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांना चयापचय शस्त्रक्रिया म्हणून देखील ओळखले जाते, कारण ते मूळ कारणांवर कार्य करतात आणि चयापचय गतिमान करतात. हे बदललेल्या आतड्यांसंबंधी मार्गाद्वारे आणि आतड्यांच्या वेगवेगळ्या भागांना उत्तेजन देऊन होते. या उत्तेजनामुळे हार्मोन्सचा स्राव होतो ज्यामुळे भूक कमी होते, तृप्तता सुधारते आणि वजन कमी होते.
  • या प्रक्रिया मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, स्लीप एपनिया इत्यादी स्थूलपणाशी संबंधित सर्व आजारांना उलट करण्यासाठी ओळखल्या जातात आणि कॉमोरबिडीटी कमी करून आयुष्य वाढवण्यासाठी ओळखल्या जातात.

स्थूलतेच्या शस्त्रक्रियेसाठी कसा मिळतो इन्शुअरन्स

  • हृदय विकार, मधुमेह आणि झोपेची समस्या असलेल्या रुग्णांना स्थूलतेचा आजार असल्यास इन्शुअरन्स कंपन्यांकडून बॅरिएट्रीक शस्त्रक्रियेसाठी आर्थिक उपाययोजना केल्या जातात.
  • खासगी रुग्णालयात बॅरिएट्रीक शस्त्रक्रियांचा खर्च हा २ ते ५ लाखांपर्यंत जातो. तर सरकारी रुग्णालयांत या शस्त्रक्रियेसाठी मोठी किंमत मोजावी लागत नाही.
Share: