कोल्हापूरच्या रुग्णाला पुण्यातील डॉक्टरांनी दिले जीवनदान

पुणे, ता. १८ : “काही लोकांना बसल्या-बसल्या झोप लागते. पण मला गाडी चालवतानाही डोळ्यावर गुंगी येत होती. वजन १४० पर्यंत वाढले होते. नंतर तर मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ऑक्सिजनचे प्रमाण ७३ टक्क्यांपर्यंत कमी आले. त्यावेळी डॉक्टरांनी व्हेंटिलेटर लावला,” वयाची पन्नाशीही न ओलांडलेले प्रकाश तासगावकर ‘सकाळ’शी बोलत होते.

कोल्हापूरच्या डॉक्टरांनी तातडीने वजन कमी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या तासगांवकर यांनी पुण्याचा रस्ता धरला. ते पुण्यातील लेपरो ओबेसो सेंटरमध्ये (एलओसी) उपचारासाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. श्वास घ्यायला त्रास होत होता. रक्तादाब वाढलेला होता. त्यांना बेडसोर्स झाले होते. त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याचे निदानही येथील डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत दिसून आले. दिवसभर ते झोपाळलेला असायचे. अशा स्थितीत त्यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांच्यावर वजन कमी करण्याची बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य होते. मात्र, शस्त्रक्रियेच्या तयारीपूर्वी त्यांच्या शरीरातील पाणी काढले. तसेच, औषधे आणि आहार सुरु केला. त्यातून शस्त्रक्रियेपूर्वीच रुग्णाचे २० किलो वजन अवघ्या सात दिवसांमध्ये कमी झाले.

या बद्दल माहिती देताना ‘एलओसी’तील बेरियाट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा म्हणाले, “रुग्णावर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यांमध्ये आतापर्यंत ४४ किलो वजन कमी झाले आहे. त्यांचे वजन उंचीचे प्रमाण (बीएमआय) शस्त्रक्रियेपूर्वी ५१ होते. ते आता ३४ पर्यंत कमी झाले आहे. म्हणजे अतीस्थूल ते सामान्य माणूस असा यशस्वी प्रवास त्यांनी या दरम्यान केला आहे.”

शस्त्रक्रियेतील आव्हान

“वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया ही नियोजित असते. त्यात शस्त्रक्रियेपूर्वीची तयारी व्यवस्थित केली जाते. हा रुग्ण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही दिवस व्हेंटिलेटर होता. रक्तदाब वाढला होता. शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण बेसुमार वाढले होते. या स्थितीत शस्त्रक्रिया करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, रुग्णाची सकारात्मक मानसिकता असल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी करता आली,” असे डॉ. शहा यांनी सांगितले.

“कोल्हापूरमध्ये व्हेंटिलेटर होतो. आता पुण्यातील डॉक्टरांनी योग्य निदान आणि उपचार करून नवीन जीवन दिले. त्यामुळे माझ्या कुटुंबासोबत मी आनंदाने राहात आहे,”

प्रकाश तासगावकर, रुग्ण

CALL NOW BOOK NOW  CHAT