नवीन वर्षात लठ्ठपणाने नवे निकष

पुणे, ता. २९ : तुमचे वजन जास्त आहे का? तुमचा ‘बीएमआय’ (बॉडी मास इंडेक्स) वाढला आहे का? असे असेल तरीही नवीन निकषांनुसार तुम्हाला लठ्ठ म्हटले जाणार नाही. पण, त्यामुळे तुमच्या शारीरिक हालचाली मंदावल्या असतील, मधुमेह, उच्चरक्तदाब यासारख्या सहव्याधी असल्यास तसेच, मानसिक ताणतणाव असेल तर मात्र तुम्ही लठ्ठ आहात, असे म्हटले जाईल. देशात आता लठ्ठपणाचे निकष बदलले आहेत. एंडोक्रिनोलॉजिस्ट, मधुमेहतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बेरियाट्रिक सर्जन, हृदयरोगतज्ज्ञ अशा तज्ज्ञांनी एकत्र येऊन केलेल्या अभ्यासातून हे नवीन निकष निश्चित केले आहेत. या बाबतचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया’मध्ये नुकताच प्रसिद्ध झाला.

संशोधनाचा निष्कर्ष काय?

या शोधनिबंधात लठ्ठपणा हा केवळ ‘बीएमआय’वर आधारित नाही. तर, नवीन लठ्ठपणा मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करण्यात आली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांची २०२४ मध्ये सर्व वैद्यकीय तज्ज्ञ आणि संघटनांनी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत पुण्यातील लेपरो ओबेसो सेंटरचे प्रमुख आणि बेरियाट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ. नीता देशपांडे स्पष्ट केले.

कसे केले संशोधन?

लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे. त्यातून आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यासाठी देशभरातील एक लाख ५३१ प्रौढांच्या माहितीची विश्लेषण करण्यात आले.

ठळक मुद्दे

  • देशव्यापी ‘क्रॉस-सेक्शनल’ अभ्यासानुसार लठ्ठपणाचे प्रमाण ४०.३ टक्के आहे.
  • त्यात महिला, शहरी नागरिक आणि चाळिशी ओलांडलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक
  • सर्वाधिक लठ्ठ नागरिक दक्षिण भारतात (४६.५१ टक्के) तर सर्वात कमी पूर्व भारतात (३२.९६ टक्के) आहेत.

लठ्ठपणाचे भारतीय मानक

‘बॉडी मास इंडेक्स’ हे लठ्ठपणा निश्चित करणारी सामान्य संज्ञा आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतात, एखाद्या व्यक्तीचा ‘बीएमआय’ 23-25 प्रति किलोग्रॅम मीटर वर्गाच्या दरम्यान असतो तेव्हा त्या व्यक्तीचे वजन जास्त आहे असे मानले जाते, तर 25 प्रति किलोग्रॅम मीटर वर्गापेक्षा जास्त ‘बीएमआय’ असलेली व्यक्ती लठ्ठ मानली जाते. तथापि, भारतीय लोकसंख्येला कंबरेभोवती, विशेषतः: यकृत आणि स्वादुपिंड यांसारख्या अंतर्गत अवयवांभोवती अतिरिक्त चरबी जमा होण्याची शक्यता असते. मधुमेहासारख्या चयापचयाशी संबंधित रोगांसाठी हे प्रारंभिक कारण ठरु शकते, ज्याला व्हिसेरल लठ्ठपणा किंवा ओटीपोटाचा लठ्ठपणा देखील म्हणतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवे निकष

  • लठ्ठपणाशी संबंधित कोणत्याही सहव्याधीसह किंवा त्याशिवाय ‘बीएमआय’ 35 प्रति किलोग्रॅम मीटर वर्गापेक्षा जास्त असणे
  • लठ्ठपणाशी संबंधित एकापेक्षा जास्त सहव्याधीसह 32.5 पेक्षा जास्त ‘बीएमआय’
  • लठ्ठपणाशी संबंधित दोन पेक्षा जास्त सहव्याधिसह 30 पेक्षा जास्त बीएमआय
  • उपचार करुनही अनियंत्रित ‘टाईप २’ मधुमेहासह आणि बीएमआय 27.5 kg/m2 पेक्षा जास्त
  • कंबरेचा घेर 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त असलेल्या महिला आणि 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असलेले पुरुष, ज्यांना लठ्ठपणाशी संबंधित आजार आहेत.

“आंतरराष्ट्रीय स्तरावर ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे आधीच लागू करण्यात आली आहेत. लठ्ठपणावरील उपचार संबंधित समस्यांवर आधारित आहेत. भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते, आणि ते जगातील सर्वाधीक तरुणांची संख्या असलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे. लठ्ठपणा आणि जास्त वजन हे जगभरात उद्रेकाचे कारण ठरत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. ही स्थिती कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा सर्व चयापचय रोगांची जननी आहे. गुडघ्यांचा संधिवात, नैराश्यासारख्या मानसिक विकारांनाही कारणीभूत ठरत आहे,”

डॉ. शशांक शाह, माजी अध्यक्ष, ऑल इंडिया असोसिएशन फॉर अॅडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी.

CALL NOW BOOK NOW  CHAT