बेरियाट्रिक सर्जरीचे वय होतंय कमी
लठ्ठपणासाठी करण्यात येणाऱ्या बेरियाट्रिक सर्जरीचे वय गेल्य २० वर्षांमध्ये सातत्याने कमी होत आहे. यापूर्वी वयाच्या पन्नाशी-साठीनंतर रुग्णाचे पाय, गुडघे, मणके, कंबर दुखल्यामुळे चालताच येत नाही. खूप दम लागतो किंवा वजन कमी केल्याशिवाय आता काहीच पर्याय नाही, असे हृदय आणि हाडांच्या डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच अगदी हतबलता आणि शेवटचा उपाय म्हणून रुग्ण बेरियाट्रिक सर्जरीसाठी तयार होतं. मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये या शस्त्रक्रियेचे वय सातत्याने कमी होत आहे.
कारणे काय?
- जगात लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. तसेच, ते भारतातही वाढल्याचे दिसते.
- किटकनाशके, अन्न साठविण्यासाठी वापरलेले घटक याचा मानवी पचनसंस्थेवर परिणाम होत आहे.
- संप्रेरके आणि पचनक्रीया बिघडत असल्याने आनुवांशिकदृष्टी चरबीचे प्रमाण जास्त असलेल्या भरतीयांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे
- जनुकीय बदलांमुळे लहान वयात होणारा लठ्ठपणा वेगाने वाढताना दिसतो.
- लहान वयात वजन वाढायाला सुरवात होणारी मुले तरुणपणी अतिलठ्ठ होतात.
- लठ्ठपणा हा आजार असल्याने वैद्यकीय विम्यातूनदेखिल ही शस्त्रक्रिया करता येते.
- हा संप्रेरके आणि चयापचय संस्थांशी संबंधीत आजार असल्याने इतर उपायांनी वजन कमी होत नसल्याचा अनुभव रुग्णांना येतो
३० ते ४० मध्ये होतात सर्वाधिक शस्त्रक्रिया
- या वयोगटा होणाऱ्या शस्त्रक्रियेची कारणे साठीनंतर होणाऱ्या शस्त्रक्रियेपेक्षाही जास्त आहेत. वजन वाढल्याने लहान वयातच कंबर आणि गुडघ्याची शस्त्रक्रिया लवकर येण्याची शक्यता असल्याचे हाडांचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे मणके, गुडघे वाचविण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.
- लठ्ठपणामुळे वंध्यत्व आल्याचे निदान झाल्यानंतर बरेच जण या उपचाराकडे वळतात
- लहान वयातील लठ्ठ मुलांमध्ये मधुमेह, घोरण्याचा आजार, फॅली लिव्हरचे प्रमाण, रक्तदाब असे आजार वाढतात. भविष्यात हृदयविकार, मेंदूविकार टाळण्यासाठी ही शस्त्रक्रिया लवकर करून घेण्याकडे आता कल वाढत आहे.
- हार्निया वारंवार उद्भवत असल्याने आधी बेरियाट्रिक सर्जरी करून नंतर हार्नियावर उपचार करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांमध्ये वाढ
यापूर्वी म्हणजे दोन दशकांपूर्वी ७० टक्के महिला लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया करून घेत. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण जेमतेम ३० टक्के होते. हे प्रमाण आता बदल असून, पुरुषांच्या शस्त्रक्रियांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ होऊन ती ४० टक्के झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पुरुषांमध्ये वाढलेले पोट हे आहे. पोटातील चरबी वाढल्याने पुरुषांमध्ये हृदयविकार, मधुमेह असे आजार वाढत आहेत.
“लठ्ठपणा हा संप्रेरक आणि चयापचयाचा आजार आहे. त्यामुळे एका ठरावी टप्प्याच्या पलिकडे गेलेल्या अतिलठ्ठ रुग्णांना बेरियाट्रिक सर्जरी हाच एक सर्वांत मोठा शास्त्रिय उपाय आहे. त्यातून पुढील आयुष्य निरोगी आणि दिर्घायू होऊ शकते,”
- डॉ. शशांक शहा, बेरियाट्रिक सर्जन, लेपरो ओबेसो सेंटर